मंगळवेढा लाईव्ह न्युज नेटवर्क |
सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूर, मंगळवेढा, माढा व मोहोळ तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे होऊन ,नुकसानग्रस्तांना सरसकट भरपाई मिळावी अशी मागणी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे.
पंढरपूर, मंगळवेढा, माढा व मोहोळ हे तालुके पूर्वीपासूनच दुष्काळजन्य परिस्थितीला तोंड देत आलेले आहेत. या परिस्थितीतून तोंड देत कशीबशी पिके जतन केली होती. परंतू अशातच या तालुक्यांतील गावांना काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा व वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसलेला आहे. या अवकाळी पावसामुळे हाता-तोंडाला आलेल्या पिकांसह केळी, डाळींब, द्राक्षे व आंबा आदी फळबागांसह शेतकऱ्यांच्या राहत्या घरांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. तालुक्यातील जवळपास प्राथमिक अंदाजे 1000 ते 1500 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे. त्यापैकी ५० टक्के क्षेत्र हे केळी फळबागांचे आहे. दुष्काळामुळे अगोदरच शेतकरी आपली पिके जगवण्यासाठी संघर्ष करीत असतांना अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे पिकांसह राहत्या घरांची छते, पत्रे उडून मोठे नुकसान झालेले आहे. यामधून बळीराजाचे संसार उघड्यावर आला असल्यामुळे त्यांना दिलासा देणेसाठी आर्थिक मदतीची अत्यंत गरज आहे.
पंढरपूर तालुक्यातील करकंब, नांदोरे, पेहे, नेमतवाडी, शेवते, गोपाळपूर, मुंढेवाडी, अनवली व इतर अनेक गावांमध्ये उभी पिके जमीनदोस्त होवून तालुक्यातील १९ गावांमधील वीजेचे खांबांसह महापारेषणचे मोठे टॉवरही पडलेले आहेत. या भागातील शेतकऱ्यांना त्वरीत वीजेची सोय होणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच मंगळवेढा तालुक्यातील खोमनाळ, भाळवणी, निंबोणी, खुपसंगी, मारापूर, अकोला, लक्ष्मी दहिवडी, मेटकरवाडी, आंधळगांव, हाजापूर, जालिहाळ, भोसे, हुन्नूर, मानेवाडी, गुंजेगांव व इतर अनेक गावांमध्ये पिकांचे फार मोठे नुकसान झालेले असून मारापूर, गुंजेगांव, खुपसंगी, लक्ष्मी दहिवडी, कचरेवाडी, जालिहाळ या गावांमधील महापारेषणचे मोठे टॉवर जमीनदोस्त झाल्यामुळे त्या गावांमधीलही वीज पुरवठा खंडीत झालेला आहे.
मोहोळ तालुक्यातील खंडाळी, पापरी, आष्टी, येवती आणि माढा तालुक्यामध्ये परीते, मोडनिंब, टेंभुर्णी, माढा व तालुक्यांतील इतर अनेक गावांमध्ये पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे.
तरी सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरीकांच्या व शेतकऱ्यांच्या पिकांचे व घरांचे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे ठराविक पंचनामे न करता सरसकट नुकसानींचे पंचनामे करून, त्वरीत नुकसानग्रस्तांना भरपाई मिळणेकामी संबंधितांना आपलेकडून आदेश देण्यात यावेत.अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना निवेदनाद्वारे केली आहे.
सदरचे निवेदन ना.फडणवीस त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेटून दिले आहे. यावरती उपमुख्यमंत्री महोदयांनी त्वरित याप्रश्नी तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार पूर्ण कार्यक्षमतेने कार्य करत असल्याचे सांगितले. राज्य सरकार झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई देण्यासाठी पूर्णपणे सकारात्मक असल्याचेही ना.फडणवीस यांनी चेअरमन अभिजीत पाटील यांना बोलताना सांगितले आहे.
वीज पडून मयत आणि जखमींना मदत मिळावी यासाठीही केली मागणी
मागील चार दिवसांपूर्वी अवकळी पावसामध्ये वीज पडून, घटलेल्या दुर्घटनेमधील जखमी व मयत झालेल्या महिल्यांच्या कुंटूबियाना आर्थिक मदत मिळण्याकरिता चेअरमन अभिजीत पाटील यांनी स्वातंत्र्य पत्र देऊन उपमुख्यमंत्री ना फडणवीस यांच्याकडे मागणी आहे.
सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह वीजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला रविवार दि.२६ मे, २०२४ रोजी दुपारी ०४.०० च्या सुमारास त्यामध्ये मौजे भटुंबरे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर येथील रहिवासी शारदा कल्याण कुंभार यांचा वीज पडून जागीच मृत्यु झाला. बाळाबाई रतन वाघमारे आणि लक्ष्मी नामदेव आडगळे या २ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. अत्यंत वाईट दुर्घटना घडली तरी सदर मयत व गंभीर जखमी झालेल्या महिला शेतातील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. या कुटुंबाला आपल्या वतीने आधार देऊन शासनाकडून आर्थिक मदत होणेकामी संबंधितांना आपले त्वरीत आदेश व्हावेत, अशी विनंतीही केलीआहे. त्यामुळे याना लवकरच मदत मिळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.
Please Share